10
खोटा देव व खरा देव
1 इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वर जे वचन तुम्हास घोषीत करीत आहे ते ऐका.
2 परमेश्वर असे म्हणतो, “देशांचे मार्ग शिकू नका.
आणि आकाशातील चिंन्हाना घाबरुन जाऊ नका, कारण त्यामुळे राष्ट्रे भयभीत असतात.
3 त्या लोकांच्या चालीरीती अर्थशून्य आहेत. कारण कोणी जंगलातून झाड तोडतो, असे ते कुऱ्हाडीने केलेले कारागीराच्या हाताचे काम आहे.
4 नंतर ते त्यांना चांदीसोन्याने त्यांना सजवतात. ते खाली पडू नयेत म्हणून हातोड्याने व खिळ्याने ते घट्ट बसवितात.
5 अशा मूर्ती काकडीच्या मळ्यातील बुजगावण्यासारख्या आहेत. त्या बोलू शकत नाहीत वा चालू शकत नाहीत. लोकांसच त्या वाहून न्याव्या लागतात.
तेव्हा त्यांना घाबरु नका. त्या मूर्ती तुमचे वाईटही करु शकत नाहीत व चांगलेही करु शकत नाहीत.”
6 परमेश्वर तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. तू महान आहेस आणि तुझ्या नावातच सामर्थ्य आहे.
7 तुला कोण भिणार नाही, हे राष्ट्राच्या राजा? कारण तू त्या योग्यतेचा आहेस,
कारण राष्ट्रांच्या सर्व ज्ञान्यांमध्ये आणि त्यांच्या सर्व राज्यांमध्ये तुझ्यासारखा कोणी नाही.
8 ते सर्व पशूसारखे आणि मूर्ख आहेत, दीड दमडीच्या लाकडाच्या मूर्तींचे अनुयायी आहेत.
9 ते लोक तार्शीशाहून ठोकून आणलेली चांदी आणि उफाजहून आणलेले सोने, कारागिराच्या व सोनाराच्या हातचे अशे ते काम आहे.
ते निळ्या आणि जांभळ्या रंगाचे कपडे चढवितात शहाणे लोक असे देव तयार करतात.
10 पण परमेश्वरच फक्त खरा देव आहे. तोच जिवंत आणि सार्वकालीक राजा आहे. पृथ्वी त्याच्या क्रोधाने कंपन पावते आणि त्याचा कोप राष्ट्रे सहन करु शकत नाहीत.
11 परमेश्वर म्हणतो, “त्या लोकांस पुढील संराष्ट्र द्या. ‘त्या खोट्या देवांनी पृथ्वीची आणि स्वर्गाची निर्मिती केली नाही. ते स्वर्गांतून आणि पृथ्वीवरुन नाहीसे होतील.
12 ज्याने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी निर्माण केली आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्याने जग निर्माण केले आपल्या समंजसपणाच्या आधारे आकाश पांघरले.
13 त्याच्या वाणीने आकाशात पाण्याच्या गडगडाट होतो, आणि तो पृथ्वीच्या शेवटापासून धुके वर चढवतो. तो पावसासाठी विजा निर्माण करतो, आणि आपल्या भांडारातून वारा बाहेर काढतो.
14 ज्ञानाशिवाय, प्रत्येक मनुष्य अज्ञानी झाला आहे. आपण निर्माण केलेल्या मूर्तीमुळेच सोनार लाजवले जातात.
कारण त्या मूर्ती म्हणजे फक्त असत्य आहे. त्यामध्ये काही सजीवपणा नाही.
15 त्या निरुपयोगी आहेत, खोट्यांचे काम आहेत, त्यांच्या शिक्षेसमयी त्यांचा नाश होईल.
16 पण देव, याकोबाचा वाटा, त्यांसारखा नाही, कारण तो सर्व गोष्टी घडवणारा आहे.
इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे. सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाव आहे.
यहूदाची वाताहत
17 अहो वेढ्यामध्ये जगत असलेल्या लोकांनो. आपल्या वस्तू गोळा करा आणि राष्ट्र सोडा.
18 परमेश्वर असे म्हणतो, पाहा, यावेळी, मी देशात राहणाऱ्यांना बाहेर फेकून देईन.
आणि त्यांना धडा शिकवावा म्हणून त्यांना दु:ख देईल.”
19 माझी मोडलेली हाडे आणि संक्रमीत झालेल्या जखमांमुळे मला हाय हाय!
तेव्हा मी म्हणालो, “खचित हे माझे दु:ख आहे, आणि मला ते पूर्णपणे भोगलेच पाहिजे.”
20 माझ्या तंबूचा नाश झाला आणि माझ्या तंबूचे सर्व दोर तुटले आहेत.
माझी मुले मला सोडून निघून गेली आहेत.
माझा तंबू उभारायला एकही मनुष्य उरला नाही. माझा निवारा बांधायला एकही मनुष्य शिल्लक नाही.
21 कारण मेंढपाळ मूर्ख झाले आहेत. ते परमेश्वराचा शोध घेत नाहीत.
म्हणून त्यांना यश नाही, त्यांचे सर्व कळप विखरले आहेत.
22 बातमीचा अहवाल आला आहे, पाहा! यहूदातील शहरांचा नाश करायला आणि कोल्ह्यांची वस्ती करायला. उत्तरेतून मोठा भूमीकंप येत आहे.
23 परमेश्वरा, मला माहीत आहे, मनुष्याची वाट ही त्याच्याकडून नाही येत. चालत्या मनुष्यास आपली पावले नीट करता येत नाही.
24 परमेश्वरा, मला शिस्त लाव! पण रागाच्या भरात नाही तर न्याय्य रीतीने शिस्त लाव! नाहीतर तू कदाचित् आमचा नाश करशील.
25 जे राष्ट्र तुला ओळखत नाही आणि जे कुटुंब तुझ्या नामाचा धावा करत नाही, त्यावर तू आपला क्रोध ओत.
कारण त्यांनी याकोबाचा विनाश केला आहे आणि त्यास खाऊन टाकले आहे, त्यांनी त्यास क्षीण केले आहे. त्याची वस्ती ओसाड केली आहे.