इब्री लोकांस पत्र
लेखक
इब्रीकरांस पत्राचा लेखक गूढतेत दडलेला आहे. पौलाला काही विद्वानांनी लेखक म्हणून सुचवले आहे, परंतु खरा लेखक निनावी राहतो. दुसरे कोणतेही पुस्तक इतक्या उत्साहाने ख्रिस्ताला ख्रिस्तत्वाचा मुख्य याजक, अहरोनाच्या याजकगणापेक्षा श्रेष्ठ आणि नियमशास्त्र आणि भविष्यवाण्यांच्या पूर्ततेविषयी परिभाषित करत नाही. हे पुस्तक आपल्या विश्वासाचा लेखक आणि पूर्ण करणारा म्हणून ख्रिस्ताला प्रस्तुत करते (इब्री 12:2).
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ.स. 64 - 70.
इब्री भाषेत लिहिलेले पत्र यरूशलेममध्ये, येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर आणि यरूशलेमचा नाश होण्यापूर्वी लिहिलेले होते.
प्राप्तकर्ता
हे पत्र मुख्यत्वे यहूदी रुपांतरीत ख्रिस्ती लोकांना उद्देशून होते जे जुन्या कराराशी परिचित होते आणि जे यहूदी धर्माकडे परत जाण्याचा किंवा सुवार्ताचा न्याय करण्यासाठी प्रलोभन करीत होते. असेही सुचवले गेले आहे की प्राप्तकर्ते “मोठ्या प्रमाणातील याजक जो विश्वासाला आज्ञाधारक मानले होते” (प्रेषित 6:7).
हेतू
इब्रीच्या लेखकाने आपल्या श्रोत्यांना स्थानिक यहूदी शिकवणींना नाकारले आणि येशूसोबत विश्वासू राहण्यास आणि येशू ख्रिस्त श्रेष्ठ असल्याचे दाखवून दिले. देवाचा पुत्र देवदूत, याजक, जुन्या करारातील नेते किंवा कोणत्याही धर्मापेक्षा श्रेष्ठ असल्याचे म्हटले. वधस्तंभावर मरून आणि मेलेल्यातून उठून, येशू आपल्या विश्वासांबद्दल तारण आणि अनंतकाळचे जीवन देतो, आमच्या पापांसाठी ख्रिस्ताने दिलेले बलिदान परिपूर्ण आणि पूर्ण होते, विश्वासामुळे देवाला प्रसन्न होते, आपण परमेश्वराच्या आज्ञेत राहून आपला विश्वास व्यक्त करतो.
विषय
ख्रिस्ताचे श्रेष्ठत्व
रूपरेषा
1. येशू ख्रिस्त स्वर्गदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे — 1:1-2:18
2. येशू नियमशास्त्र आणि जुन्या करारापेक्षा श्रेष्ठ आहे — 3:1-10:18
3. विश्वासू राहून परीक्षांमध्ये धीर धरणे — 10:19-12:29
4. अंतिम उपदेश आणि अभिवादन — 13:1-25
1
प्रस्तावना
1 देव प्राचीन काळांमध्ये आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे अनेक वेळेस वेगवेगळ्या मार्गांनी बोलला, 2 परंतु या शेवटच्या दिवसात तो आपल्याशी त्याच्या पुत्राद्वारे बोलला आहे, त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले. देवाने पुत्राकरवीच विश्व निर्माण केले. 3 पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांस त्यांच्या पापांपासून शुद्ध केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूला बसला.
4 तो देवदूतांपेक्षा श्रेष्ठ झाला. त्याचे नावसुद्धा जे वारशाने त्यास मिळाले ते त्यांच्या नावापेक्षा श्रेष्ठ आहे.
देवाचा पुत्र देवदूतांपेक्षा श्रेष्ठ
5 देवाने कोणत्याही देवदूताला म्हणले नाही कीः
“तू माझा पुत्र आहेस;
आज मी तुझा पिता झालो आहे?”
आणि पुन्हा,
‘मी त्याचा पिता होईन,
व तो माझा पुत्र होईल?’
6 आणि पुन्हा, देव जेव्हा त्याच्या पुत्राला जगामध्ये आणतो, तो म्हणतो, “देवाचे सर्व देवदूत त्यास नमन करोत.” 7 देवदूताविषयी देव असे म्हणतो,
“तो त्याच्या देवदूतांना वायु बनवतो,
आणि त्याच्या सेवकांना तो अग्नीच्या ज्वाला बनवतो.”
8 पुत्राविषयी तर तो असे म्हणतोः
हे देवा, तुझे राजासन सदासर्वकाळासाठी आहे,
आणि तुझे राज्य युगानुयुगीचे आहे आणि “तुझा राजदंड न्यायीपणाचा राजदंड आहे.
9 नीतिमत्त्व तुला नेहमी प्रिय आहे. अनीतीचा तू द्वेष करतोस.
म्हणून देवाने, तुझ्या देवाने,
तुझ्या सोबत्यांपेक्षा तुला आनंददायी तेलाचा अभिषेक केला आहे.”
10 आणि हे प्रभू, सुरुवातीला तू पृथ्वीचा पाया घातलास,
आणि आकाश तुझ्या हातचे काम आहे.
11 ती संपुष्टात येतील पण तू सतत राहशील
ते कापडासारखे जुने होतील.
12 तू त्यांना अंगरख्यासारखे गुंडाळशील,
तू त्यांना कपड्यासारखे बदलशील,
पण तू नेहमी सारखाच राहशील,
आणि तुझी वर्षे कधीही संपणार नाहीत.
13 तो कोणत्याही दूताला असे म्हणाला नाही,
तुझ्या वैऱ्याला तुझे पादासन करीपर्यंत
तू माझ्या उजवीकडे बैस.
14 सर्व देवदूत देवाच्या सेवेतील आत्मे नाहीत काय? आणि तारणाचा वारसा ज्यांना मिळेल त्यांना मदत करायला ते पाठवले जातात की नाही?