The Gospel According to Matthew
मत्तय कृत शुभवर्तमान
१
येशू ख्रिस्ताची वंशावळी
१ अब्राहामाचा पुत्र दावीद याचा पुत्र जो येशू ख्रिस्त याची वंशावळी. २ अब्राहामास इसहाक झाला, इसहाकास याकोब, याकोबास यहूदा व त्याचे भाऊ झाले. ३ यहूदास तामारेपासून पेरेस व जेरह झाले, पेरेसास हेस्रोन, हेस्रोनास अराम झाला. ४ अरामास अम्मीनादाब, अम्मीनादाबास नहशोन, नहशोनास सल्मोन, ५ सल्मोनास राहाबेपासून बवाज, बवाजास रूथपासून ओबेद, ओबेदास इशाय झाला.
६ आणि इशायास दावीद राजा झाला. उरीयाच्या पत्नीपासून दावीदास शलमोन झाला. ७ शलमोनास रहबाम, रहबामास अबीया, अबीयास आसा झाला, ८ आसास यहोशाफाट, यहोशाफाटास योराम आणि योरामास उज्जीया, ९ उज्जीयास योथाम, योथामास आहाज, आहाजास हिज्कीया, १० हिज्कीयास मनश्शे, मनश्शेस आमोन, आमोनास योशीया, ११ आणि बाबेलास देशांतर झाले त्यावेळी योशीयास यखन्या व त्याचे भाऊ झाले.
१२ बाबेलास देशांतर झाल्यानंतर यखन्यास शल्तीएल झाला, शल्तीएलास जरूब्बाबेल झाले. १३ जरूब्बाबेलास अबीहूद, अबीहूदास एल्याकीम, एल्याकीमास अज्जुर झाला. १४ अज्जुरास सादोक, सादोकास याखीम, याखीमास एलीहूद झाला. १५ एलीहूदास एलाजार झाला. एलाजारास मत्तान, मत्तानास याकोब, १६ याकोबास योसेफ झाला; जो मरीयेचा पती होता जिच्यापासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मास आला. १७ अशाप्रकारे अब्राहामापासून दावीदापर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या, दावीदापासून बाबेलास देशांतर होईपर्यंत चौदा पिढ्या आणि बाबेलास देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या.
येशू ख्रिस्ताचा जन्म
१८ येशू ख्रिस्ताचा जन्म याप्रकारे झाला; त्याची आई मरीया, हिची योसेफाशी मागणी झालेली होती, पण त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. १९ मरीयेचा पती योसेफ हा नीतिमान होता परंतु समाजामध्ये तिचा अपमान होऊ नये अशी त्याची इच्छा होती म्हणून त्याने गुप्तपणे तिच्यासोबतची मागणी मोडण्याचा निर्णय घेतला. २० तो या गोष्टींविषयी विचार करीत असता, त्यास स्वप्नात प्रभूच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, “योसेफा, दावीदाच्या पुत्रा, तू मरीयेला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास घाबरू नकोस, कारण जो गर्भ तिच्या पोटी राहीला आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. २१ ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, तो आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारील.” २२ प्रभूने संदेष्ट्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते परिपूर्ण व्हावे यासाठी हे सर्व झाले, ते असे,
२३ “पाहा कुमारी गर्भवती होईल व पुत्राला जन्म देईल,
आणि त्यास इम्मानुएल हे नाव देतील.” या नावाचा अर्थ, “आम्हाबरोबर देव.”
२४ तेव्हा झोपेतून उठल्यावर प्रभूच्या दूताने आज्ञा दिली होती तसे योसेफाने केले, त्याने तिचा आपली पत्नी म्हणून स्वीकार केला, २५ (तरी मुलाचा जन्म होईपर्यंत त्याने तिच्याशी सहवास ठेवला नाही.) आणि त्याने त्याचे नाव येशू ठेवले.