हबक्कूक
लेखक
हबक्कूक 1:1 हबक्कूकचे पुस्तक हे संदेष्टा हबक्कूकचे दैवी कथन म्हणून ओळखले जाते. त्याच्या नावापलीकडे, आम्हाला मुळात हबक्कूकविषयी काहीच माहिती नाही. त्याला “हबक्कूक संदेष्टा” असे म्हटले जाते, असे दिसते की तो तुलनेने सुप्रसिद्ध होता आणि त्याची आणखी ओळख पटविण्याची गरज नव्हती.
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ. पू. 612 - 605.
दक्षिणेकडील राज्यातील यहूदा राष्ट्राची पडझड होण्याआधीच हबक्कूकने हे पुस्तक लिहिले असावे.
प्राप्तकर्ता
यहूदाचे लोक (दक्षिणेकडचे राज्य) आणि सर्वत्र देवाच्या लोकांना सामान्य पत्र.
हेतू
हबक्कूक आश्चर्यचकित झाला होता की देवाने आपल्या निवडलेल्या लोकांना त्यांच्या शत्रूंच्या हातून सध्याच्या दुःखातून जाण्याची का परवानगी दिली होती. देव उत्तर देतो आणि हबक्कूकचा विश्वास पुन्हा दिला जातो, या पुस्तकाचा हेतू आहे की, आपल्या लोकांना संरक्षक म्हणून परमेश्वर, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांकरता टिकून राहील, हे घोषित करण्यासाठी की, परमेश्वर, यहूदाचा सार्वभौम योद्धा या नात्याने बाबेलकरांचा न्याय करणार आहे. हबक्कूकचे पुस्तक आम्हांला अभिमानी लोकांचे चित्र देते, तर नीतिमान देवामध्ये विश्वासाने राहतात (2:4).
विषय
सार्वभौम देव यावर विश्वास ठेवणे
रूपरेषा
1. हबक्कूकची तक्रार — 1:1-2:20
2. हबक्कूकची प्रार्थना — 3:1-19
1
अन्यायाबद्दल हबक्कूकची तक्रार
संदेष्टा हबक्कूक याला मिळालेले देववचन.
“हे परमेश्वरा, मदतीसाठी मी किती वेळ आरोळी मारू,
आणि तू ऐकणार नाहीस?
जाचजुलमात व भयात मी तुला आरोळी मारली,
पण तू मला वाचवत नाहीस!
तू मला अन्याय
व अनर्थ का पाहायला लावतोस?
नाश आणि हिंसा माझ्यासमोर आहेत;
आणि भांडण व वाद उठतो!
ह्यास्तव नियमशास्त्र कमकुवत झाले आहे,
आणि न्याय कोणत्याही वेळी टिकत नाही,
कारण दुष्ट नितीमानाला घेरतो,
त्यामुळे खोटा न्याय बाहेर येतो.”
खास्दी यहूदाला शिक्षा करतील
“इतर राष्ट्रांकडे पाहा! त्यांचे परिक्षण करा, आणि आश्चर्याने विस्मित व्हा!
कारण खचित मी तुमच्या दिवसात अशा काही गोष्टी करणार की, त्या तुम्हास सांगण्यात येतील तेव्हा तुमचा विश्वास बसणार नाही.
कारण पाहा! मी खास्द्यांची* बाबेल उठावनी करतो, ते भयानक व उतावळे राष्ट्र आहे.
जी घरे त्यांची नाहीत, त्यांचा ताबा घ्यायला ते पृथ्वीच्या विस्तारावरून चाल करीत आहेत.
ते दारूण व भयंकर आहेत, त्यांचा न्याय व त्यांचे वैभव ही त्यांच्यापासूनच पुढे जातात.
त्यांचे घोडे चित्यांपेक्षा वेगवान आहेत आणि संध्याकाळच्या लांडग्यांपेक्षा जलद आहेत. त्यांचे घोडेस्वार दिमाखाने पुढे धावत जातात,
आणि त्यांचे घोडेस्वार दूरून येतात, खाण्यासाठी घाई करणाऱ्या गरुडाप्रमाणे ते उडतात.
ते सर्व हिंसा करण्यास येतात,
त्यांचा जमाव वाळवंटातील वाऱ्याप्रमाणे समोर जातो, आणि ते बंदिवानास वाळूप्रमाणे गोळा करतात!
10 म्हणून ते राजांची थट्टा करतील, आणि राज्यकर्ते त्यांच्यासाठी केवळ चेष्टा असे आहेत!
ते प्रत्येक दुर्गाला हसतात, कारण तो धुळीचा ढीग करून तो ताब्यात घेतात!
11 मग ते वाऱ्याप्रमाणे सुसाट्याने पार जातील व दोषी होतील, त्यांचा असा समज आहे की आमचा पराक्रम आमचा देव आहे.”
हबक्कूक परमेश्वराजवळ तक्रार करतो
12 “हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्या पवित्रा, तू प्राचीनकाळापासून नाहीस काय? आम्ही मरणार नाही.
परमेश्वरा तू त्यांना न्यायासाठी नेमले आहे, आणि हे खडका तू त्यांना शासन करण्यासाठीच स्थापिले आहे.
13 तुझे डोळे इतके पवित्र आहेत की त्यांना दुष्टपणा पाहवत नाही, आणि तुझ्याने वाईटाकडे दृष्टी लावली जात नाही.
मग जे विश्वासघाती आहेत त्यांच्याकडे तू का पाहतोस?
जो आपल्याहून नीतिमान त्यास जेव्हा दुर्जन गिळून टाकतो तेव्हा तू का शांत राहतोस?
14 तू लोकांस समुद्रातल्या माशांप्रमाणे केले आहेस, त्यांच्यावर अधिकारी नसलेल्या जीवांप्रमाणे ते आहेत.
15 ते त्या गळाने सर्वांना उचलून घेतात; ते आपल्या जाळ्यात त्यांना धरून घेतात
आणि पागाने त्यांना गोळा करतात. त्यामुळे ते हर्ष करतात व मोठ्याने ओरडतात.
16 म्हणून ते आपल्या माशांच्या जाळ्याला यज्ञ अर्पण करतात आणि आपल्या पागापुढे धूप जाळतात.
कारण त्यापासून त्यांना पुष्ट पशूंचा वाटा आणि त्यांचे अन्न म्हणजे चरबी असलेले मांस हे मिळते.
17 तेव्हा ते त्यांचे जाळे रिकामे करतील काय? आणि कोणतीही दया न दाखविता, ते राष्ट्रांची कत्तल करीतच राहणार काय?”

*1:6 बाबेल